भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) पीएसएलव्हीसी-३४ हा प्रक्षेपक २० उपग्रह घेऊन बुधवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून झेपावला. एसएलव्हीसी-३४ च्या या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोने एकाचवेळी २० उपग्रह सोडण्याचा नवा इतिहास रचला. इस्रोच्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रात सोमवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी म्हणजे तब्बल ४८ तास अगोदर
पीएसएलव्हीसी-३४ या प्रक्षेपकाच्या प्रक्षेपणासाठीचे काउंटडाउन सुरू झाले होते. त्यानंतर आज सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी प्रक्षेपक अवकाशात झेपावला. याआधी प्रक्षेपकासोबत एकाचवेळी १० उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते. मात्र यावेळी एकाचवेळी २० उपग्रह अवकाशात सोडून इस्रोने विक्रमी कामगिरी केली आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार २० उपग्रहांचे एकूण वजन सुमारे १२८८ किलो इतके आहे. यापैकी दोन उपग्रह भारतीय बनावटीचे असून अन्य १८ विदेशी उपग्रह आहेत. विदेशी उपग्रहांमध्ये अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि इंडोनेशिया या देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे.
दोन भारतीय बनावटीच्या उपग्रहांमध्ये पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'स्वयम्' आणि तामिळनाडू येथील सत्याभामा विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी तयार केलेल्या उपग्रहाचा समावेश आहे. 'स्वयम्' या उपग्रहाचे वजन हे ९९० ग्रॅम असून त्याच्या निर्मितीसाठी ५० लाख रुपये खर्च आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून कौतुक केले. एकाचवेळी २० उपग्रह अवकाक्षात प्रक्षेपित करण्याचा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल त्यांनी शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment