लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या एम.सी.मेरी कोमला आगामी रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान द्यावे, अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) आणि बॉकसग इंडियाच्या अस्थायी समितीने केली आहे. मेरी कोमला पात्रता स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला होता. ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक मिळवण्याची क्षमता तिच्याकडे असल्यामुळेच तिच्याकरिता विशेष प्रवेशिका
मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
‘‘मेरी कोम ही केवळ भारतीय खेळाडूंसाठी नव्हे तर अनेक परदेशी खेळाडूंसाठीही प्रेरणास्थान आहे. तिला पात्रता स्पर्धेत निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच तिला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडे (एआयबीए) ही विनंती केली आहे,’’ असे आयओएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी सांगितले.
बॉक्सिंगकरिता नियुक्त करण्यात आलेल्या अस्थायी समितीचे अध्यक्ष किशन नरसी यांनीही एआयबीएला पत्र पाठविले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘५१ किलो गटात केवळ एकच विशेष प्रवेशिका असल्यामुळे त्यावर मेरी कोमला संधी द्यावी अशी विनंती केली आहे.
मेरीने आतापर्यंत पाच वेळा जागतिक स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. याचप्रमाणे लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदकाची कमाई केली होती.
No comments:
Post a Comment