अनिल कुंबळे आणि प्रवीण अमरे या दोन्ही माजी क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या प्रशिक्षकपदासाठी चुरस असल्याचे म्हटले जात आहे. कुंबळेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९५६ बळी आहेत. दुसरीकडे अमरे यांना युवा खेळाडूंची चांगली माहिती आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला प्रशिक्षकपदी नियुक्त करायचे, हे सल्लागार समितीपुढील आव्हान असेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. कुंबळे आणि
भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीपुढे मंगळवारी सादरीकरण केले. या समितीतील माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण यांनी या वेळी सर्व उमेदवाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता, पण त्यांना बीसीसीआयने मुलाखतीबाबत कळवलेच नाही.
शास्त्री भारताबाहेर असल्यामुळे त्यांनी ‘स्काइप’द्वारे मुलाखत दिली, तर कुंबळे मुलाखतीसाठी स्वत:हून हजर होता. या वेळी टॉम मूडी आणि स्टुअर्ट लॉ यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरसिंग’द्वारे मुलाखती दिल्या. त्याचबरोबर प्रवीण अमरे आणि लालचंद राजपूत या भारताच्या माजी क्रिकेटपटूंच्या मुलाखती झाल्या. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव असलेल्या इंग्लंडच्या अँडी मोल्स यांनीही या वेळी ‘व्हिडीओ कॉन्फरसिंग’द्वारे मुलाखत दिली.
क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकाबाबतचा निर्णय बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांना कळवणार आहे. २४ जून रोजी धरमशाला येथे बीसीसीआयची वार्षिक सभा होणार असून या वेळी प्रशिक्षकाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
‘‘यापुढे प्रशिक्षकपदासाठी कोणतीही मुलाखत घेण्यात येणार नाही. ही प्रक्रिया येथेच संपत आहे. आम्ही दहा उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, या सर्वानी या पदासाठीचे सादरीकरणे केले. याबाबतचा अहवाल आम्ही बीसीसीआयच्या सचिवांना सादर करणार आहोत,’’ असे सल्लागार समितीचा सदस्य आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सांगितले.
बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी जाहिरात दिली होती. त्यानंतर बीसीसीआयकडे एकूण ५७ अर्ज आले होते, या अर्जाची छाननी करून २१ उमेदवारांची निवड करण्यात आली होती.
संदीप पाटील यांना निमंत्रण नाही
भारतीय संघाचे विद्यमान निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असला तरी त्यांना मुलाखतीचे निमंत्रण न देता बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने त्यांना डावलल्याचे म्हटले जात आहे. पण पाटील यांनी मात्र याबाबत कोणताच आक्षेप नोंदवलेला नाही.
याबाबत पाटील म्हणाले की, ‘‘मला बीसीसीआयकडून मुलाखतीचे निमंत्रण मिळाले नाही. बीसीसीआय हे प्रसिद्ध क्रिकेट मंडळ आहे आणि मला खात्री आहे की, ते या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड करतील. माझ्याबाबत जो काही प्रकार घडला त्याबाबत खंत नाही आणि कुठलीच तक्रारही नाही. बीसीसीआयने मला माझ्या पात्रतेपेक्षा बरेच जास्त काही दिले आहे. बीसीसीआयची सल्लागार समिती याबाबत योग्य निर्णय घेईल, याबद्दल मला विश्वास आहे.’’
No comments:
Post a Comment