लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला रिओ ऑलिंपिकला मुकावं लागणार आहे. क्रीडाविश्वाचा महाकुंभमेळा मानल्या जाणाऱ्या ऑलिंपक स्पर्धेत तिला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याची विनंती आज आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) फेटाळली असून मेरीच्या चाहत्यांना निराश केलं आहे. रिओ ऑलिंपिकच्या पात्रता स्पर्धेत मेरी कोमला पराभव पत्करावा लागला होता. परंतु,
बॉक्सिंगमधील भारताचं आशास्थान असलेल्या, पदकावर नाव कोरण्याची क्षमता असलेल्या मेरीसाठी भारतीय ऑलिंपिक असोसिएशन आणि बॉक्सिंग इंडिया पुढे सरसावली होती. तिला रिओमध्ये विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान द्यावे, अशी विनंती त्यांनी आयओसीला केली होती. परंतु, पाच वेळा जागतिक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणाऱ्या आणि लंडनमध्ये ब्राँझ पदक जिंकणाऱ्या मेरीला आयओसीकडून खुशखबर मिळू शकलेली नाही.
रिओ ऑलिंपिकमध्ये मेरी कोमला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्यास आयओसीनं नकार दिल्याची माहिती बॉक्सिंगकरिता नियुक्त करण्यात आलेल्या अस्थायी समितीचे अध्यक्ष किशन नरसी यांनी दिली. त्यामुळे भारताचं एक पदक कमी झाल्याची भावना व्यक्त होतेय.
No comments:
Post a Comment