पाकिस्तानातील प्रसिद्ध कव्वाल गायक अमजद साबरी यांची हत्या संगीत क्षेत्रात हळहळ निर्माण करणारी आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सांगीतिक संस्कृती एकच आहे. याचे कारण भारतीय अभिजात संगीताच्या परंपरेत मुसलमानी आक्रमणानंतर जे बदल होत गेले, ते संगीताच्या विकासासाठी पूरकच ठरले. त्यामुळे दुधात साखर विरघळावी, याप्रमाणे देवळात स्थापित झालेले संगीत आणि मुस्लीम जगतात गायले
जाणारे संगीत यांचा एक अनोखा संगम निर्माण झाला. सत्ताधारी असल्याने भारतात उस्तादी परंपरेला महत्त्वही प्राप्त झाले. परंतु त्यातही संगीत कलेमध्ये कायमच अग्रस्थानी असलेली सौंदर्यपूर्णतेची बाजू मुसलमान गवयांनी कायमच तोलून धरली. भारतीय कलावंतांनी त्या सौंदर्याचा कायमच आस्वाद घेतला.
अमजद साबरी हे या अशा प्रदीर्घ आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या संगीत परंपरेचे प्रतीक होते. कव्वाली हा गायन प्रकार सूफी संगीतातून आला आणि सूफी हा एक आध्यात्मिक पंथ आहे. त्याला निश्चित अशी वैचारिक बैठक आहे. त्यातून व्यक्त होणाऱ्या संगीताचा आरंभच मुळी कव्वालीतून झाला आणि नंतर त्यातून अभिजात संगीतातील अनेक नवनवे प्रकार उदयाला आले. भारतीय संगीतातील या बदलांनंतर कव्वाली या मूळ प्रकाराची लोकप्रियता उत्तरेकडील काही प्रांतांपुरतीच सीमित राहिली असली, तरीही तिचे महत्त्व मात्र मुळीच कमी झाले नाही. साबरी या नावाला संगीताच्या क्षेत्रात खूप आदराचे स्थान आहे. अमजद साबरी यांचे काका मकबूल साबरी आणि गुलाम फरीद साबरी यांनी पन्नासच्या दशकात एकत्रितपणे कव्वालीच्या कार्यक्रमांना सुरुवात केली. साबरी ब्रदर्स या नावाने त्यांची ओळख अक्षरश: जगभरात झाली. कव्वालीतून आध्यात्मिक संदेश देणारा कलावंत म्हणून त्यांची ओळख होती. गेली अनेक दशके या बंधूंनी कव्वाली संगीताच्या क्षेत्रात आपला खास ठसा उमटवला होता. आपल्या या काकांकडूनच संगीताचे शिक्षण घेतलेले अमजद साबरी यांनाही अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर जाता आले. ‘आफ्रिकाना कलाम’ ही त्यांच्या संगीत सादर करण्याची विशिष्ट पद्धत होती. जगभरात सर्वत्र लोकप्रियता मिळवलेल्या साबरी ब्रदर्स यांनी संगीताच्या रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. कव्वालीची आध्यात्मिकतेकडून रंजनात्मकतेकडे झालेली वाटचाल आणि अशाही स्थितीत मूळ कव्वाली टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपोआपच अमजद साबरी यांच्यावर येऊन पडली. त्यांच्या हत्येमुळे भारत आणि पाकिस्तानातील संगीत दुनिया हळहळणे अगदीच स्वाभाविक होते. कलावंताची हत्या झाली, तरी त्याचे संगीत कुणालाच ठार मारून टाकता येत नाही. कारण त्या संगीताने लाखो रसिकांच्या हृदयात मिळवलेले स्थान कशानेच हिरावले जाऊ शकत नाही. वयाच्या अवघ्या पंचेचाळिसाव्या वर्षी अशी हत्या होणे यामागे पाकिस्तानातील काही घटनांचे धागेदोरे असतीलही. मात्र संगीताची त्यामुळे मोठी हानी झाली आहे, यात शंका नाही.
No comments:
Post a Comment