केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरु असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांकडे त्यांच्या विभागाने केलेल्या कामाचा हिशेब मागितला आहे. यासंदर्भात ३० जूनला होणाऱ्या बैठकीत मंत्र्यांना 'सेल्फ अप्रायझल' सादर करावा लागणार आहे. सरकारनं दुसरा अर्थसंकल्प सादर केल्यापासून आतापर्यंत आपल्या विभागानं कोणती कामे केली, याचे सादरीकरण मंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर करावे, असा आदेश देण्यात आला आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी
सांगितले. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरु झाल्यानंतर पंतप्रधानांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली असून, पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, संभाव्य मंत्रिमंडळात तेथील जास्तीत जास्त प्रतिनीधींना स्थान देण्यात येईल, असे बोलले जाते.
पुढच्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी स्वतः आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेत आहेत. तसेच सरकारने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी योजना निश्चित कालावधीत कशा पूर्ण होतील, याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. दुसरीकडे सरकारकडून उच्च श्रेणी मिळावी, यासाठी मंत्री आणि त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांची सध्या प्रचंड धावपळ सुरू असल्याचे बोलले जाते.
No comments:
Post a Comment