केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरातील विविध प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात आलेल्या भरमसाठ जाहिरातींवर चक्क शून्य रुपये खर्च झाल्याची अजब माहिती केंद्राच्या माहिती आणि प्रसारण खात्याने माहितीच्या अधिकारात दिली असून, याच्या विरोधात अपील करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. तसेच जर या जाहिरातींवर शून्य रुपये खर्च झाला
असेल तर या जाहिरातींसाठी खर्च कोणी केला, असा सवालही मलिक यांनी केला आहे. या जाहिरातींवर किती खर्च झाला याची विचारणा माहिती अधिकारात करण्यात आली होती. केंद्राच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या डायरेक्टरेट ऑफ अॅडव्हर्टायझिंग अँड व्हिज्युअल्स पब्लिसिटी या विभागाने ८ जूनला दिलेल्या उत्तरात जाहिरातींवर काहीही खर्च झालेला नाही, असे म्हटले आहे. मग हा खर्च कोणी केला, असा प्रश्न उपस्थित होतो, असे मलिक म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे यांच्या एमआयडीसी जमीन घोटाळ्याची निवृत्त न्या. झोटींग यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले. पण, ही चौकशी 'कमिनश ऑफ एन्क्वायरी अॅक्ट'नुसार झाली पाहिजे. तसेच त्यांच्यावरील सर्व आरोपांची एकत्रित चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी वार्ताहरांशी बोलताना केली.
आधी क्लीन चिट द्यायची आणि नंतर निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशीचे आदेश द्यायचे, हा प्रकार म्हणजे त्या चौकशीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मलिक यांनी केला. खडसे यांना वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करू नये, राज्य सरकारमधील ११ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून, त्यात भाजपचे नऊ तर शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. आणखीही काही मंत्र्यांचे घोटाळे लवकरच बाहेर येतील, असे सूतोवाच मलिक यांनी केले.
दरम्यान, गेल्या १५ वर्षांतील भूखंड वाटपाच्या तत्कालीन सरकारच्या निर्णयाबाबत श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यांनी श्वेतपत्रिका नक्की काढावी, पण त्या कालखंडाचा कालावधी वाढवून तो मार्च १९९५ ते जून २०१६ पर्यंतच्या भूखंडवाटपाचाही त्या श्वेतपत्रिकेत समावेश करावा. तसेच मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील किती भूखंडांचे वाटप झाले, याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी उघड करावी. त्या भूखंडांचा वापर सध्या कशासाठी होतो हे मुंबईकरांना समजले पाहिजे, असे मलिक म्हणाले.
No comments:
Post a Comment