बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्या यांनी पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांच्यावर तिकीट विकत असल्याचा गंभीर आरोप करीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मौर्या यांनी बसपाचे प्रदेशाध्यक्ष, महासचिव पद भूषविले आहे. तसेच मायावती यांच्या सरकारमध्ये विविध मंत्रीपदेही भूषविली आहेत. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येवून ठेपलेल्या असताना अचानक मौर्या यांनी पक्ष सोडला
आहे. उत्तर प्रदेशात या घटनेमुळे दिल्लीत चर्चा सुरू असून मौर्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मायावती या पैसे देवून तिकीट वाटप करतात असा गंभीर आरोप करीत मौर्या यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी आंबेडकरांचे स्वप्न विकले असून मायावती यांचा आंबेडकरवादीपणा हा केवळ दिखावा आहे, असा आरोप मोर्या यांनी केला. मायावती यांनी बसपा संस्थापक कांशीराम यांच्या मिशनची हत्या केली, असा गंभीर आरोपही मौर्या यांनी केला. दरम्यान, बसपा सुप्रीमो मायावती यांच्या खास मर्जीतील नेते म्हणून मौर्या यांची ओळख होती. मौर्या हे समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याची माहिती असून प्रवेशानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २७ जून रोजी अखिलेश सिंह यादव यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.
. ..मौर्यांची हकालपट्टी केली असती
स्वामी प्रसाद मौर्या यांनी बसपाला सोडचिठ्ठी दिली ते एका अर्थाने बरेच झाले. मौर्या यांनी पक्ष सोडला नसता तर आम्ही त्यांची हकालपट्टी केली असती, असे मायावती यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मौर्या २०१२ मध्ये पक्ष सोडणार होते. त्यांना त्यांच्या मुला-मुलींसाठी पक्षाचे तिकीट हवे होते. मुला-मुलींना तिकीट देवून घराणेशाही वाढवण्याला पक्षाचा विरोध आहे, असे मायावती म्हणाल्या.
No comments:
Post a Comment