इलेक्ट्रॉनिक माध्यमे सुरू होण्याच्या खूप आधीच्या काळात २४ तास बातमीचा शोध घेणारे फार कमी पत्रकार होते; त्यातीलच एक म्हणजे इंदर मल्होत्रा. १४ व १५ ऑगस्टच्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते दिल्लीत रायसीना हिल्स येथे उपस्थित होते. स्वातंत्र्यापासून या देशातील सामाजिक, राजकीय बदल साक्षेपाने टिपणारे मल्होत्रा यांच्या निधनाने या सर्व घडामोडींचा चालताबोलता ज्ञानकोश काळाच्या
पडद्याआड गेला आहे. १९३० मध्ये चंडीगड येथे जन्मलेल्या इंदर मल्होत्रा यांनी पंजाब विद्यापीठातून शिक्षणानंतर पत्रकारितेचा पेशा निवडला. ते उत्तम बातमीदार, राजकीय समीक्षक तर होतेच, पण बातमीदारी करताना संरक्षण क्षेत्रात त्यांच्याइतक्या चांगल्या पद्धतीने वार्ताकन कुणी केले नाही. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकी अध्यक्षांना बराक म्हणून संबोधल्यावर अनेकांना जरा आश्चर्य वाटले, पण इंदर मल्होत्रा त्यांच्या उमेदीच्या काळात अनेक देशी-विदेशी नामवंतांना नावाने हाक मारत असत, तेव्हा पत्रकार परिषदांमध्ये बाकीचे लोक बुचकळ्यात पडत. राजकीय वर्तुळातील सर्व व्यक्तींशी त्यांचा घनिष्ठ परिचय होता. त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला यूपीआयचे वार्ताहर म्हणून काम केले. ‘दी स्टेट्समन’, ‘ टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रांत त्यांनी बराच काळ पत्रकारिता केली. ‘दी गार्डियन’चे भारतातील प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले, नंतर ते स्तंभलेखन करीत होते. नेहरू फेलो व व्रुडो विल्सन फेलो या विद्यावृत्ती त्यांना मिळाल्या. ‘इंदिरा गांधी: अ पर्सनल अँड पॉलिटिकल बायॉग्राफी’ हे त्यांचे पुस्तक गाजले. त्यानंतर डायनॅस्टीज ऑफ इंडिया अँड बियाँड (२००३) हे पुस्तक त्यांनी लिहिले. अलीकडे ते इंडियन सिक्युरिटी पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर पुस्तकावर काम करीत होते. त्यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’मध्ये ‘रिअर व्ह्य़ू’ हा स्तंभ बराच काळ लिहिला. त्यात त्यांनी समकालीन भारताच्या इतिहासातील अनेक घटनांचा वेध घेतला. आणीबाणी, बांगला देश युद्ध अशा अनेक विषयांवर त्यांनी मते मांडली. विविध नेत्यांची बलस्थाने व कमकुवत घटक सांगतानाच त्यांनी त्याचे निर्णयांवर काय परिणाम झाले याचे विश्लेषण केले. नेहरूवादी असूनही त्यांनी चीन युद्धाच्या वेळी त्यांच्या धोरणावर परखड टीका केली होती. आजकाल पडद्यामागचे राजकारण फार कमी टिपले जाते, पण त्यांनी पत्रकार म्हणून ते फार बारकाईने टिपले होते. सहकाऱ्यांच्या कलागुणांचे कौतुकही ते करीत असत. त्यांनी बातमीदारी करताना बातमी व मते यांचे मिश्रण कधीच होऊ दिले नाही. राजकीय नेत्यांना त्यांनी जवळून पारखले, तटस्थ निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी बातमीचा स्रोत कधीही उघड केला नाही. त्यांची स्मृती तर चांगली होतीच, शिवाय आयुष्यभर त्यांना घटनांच्या नोंदी ठेवण्याची सवय होती. आजारी असतानाही जेव्हा बरे वाटेल तेव्हा ते पुन्हा स्तंभलेखनाला सज्ज असत. त्यांना २०१३ मध्ये ‘रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्कार’ने गौरवण्यात आले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.
No comments:
Post a Comment