अपेक्षेप्रमाणेच चीनच्या विरोधामुळे भारताच्या अणुइंधन पुरवठादार गटातील (एनएसजी) प्रवेशाचा तिढा गुरुवारी कायमच राहिला. अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशांना एनएसजीमध्ये प्रवेश देता येणार नाही, हा मुद्दा चीनने गुरुवारच्या बैठकीत उपस्थित केल्याने भारताला तुर्तास या गटापासून दूर राहावे लागण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्याशी
आवाहनात्मक चर्चा करूनही चीनने आपला विरोधाचा पवित्रा कायमच ठेवला.
अमेरिकेपाठोपाठ फ्रान्ससारख्या बड्या देशाने अणुइंधन पुरवठादार देशांच्या (एनएसजी) गटात भारताला प्रवेश मिळावा यासाठी पाठिंबा दिल्याने भारताचा दावा बळकट झाला असला, तरी सर्व भवितव्य चीनच्याच हाती आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत भारताच्या प्रवेशावर विविध देशांकडून मतांतरे मांडली जात होती. बैठकीच्या पहिल्या सत्रात जपानने भारताचा दावा उचलून धरला. मात्र यावरील चर्चा अपूर्ण राहिल्याने रात्री दुसऱ्या सत्रात हा विषय कार्यक्रमपत्रिकेवर घेण्याचे ठरले. यानुसार रात्री उशिरा पुन्हा झालेल्या बैठकीत चीन, ब्राझिल, ऑस्ट्रिया आणि आयर्लंड यांनी भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला. आता आज, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीवरच भारताच्या सदस्यत्वाचे भवितव्य अवलंबून आहे.
मोदी-जिनपिंग भेट
ताश्कंद येथे झालेल्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग गुरुवारी परस्परांना भेटले. ५० मिनिटांच्या या भेटीदरम्यान मोदी यांनी एनएसजीच्या मुद्द्यावर जिनपिंग यांच्याकडे पाठिंब्याचे आवाहन केल्याचे समजते.
No comments:
Post a Comment