अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात गोल डागून आपल्या देशाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा मान मिळवला आहे. अमेरिकेसोबत झालेल्या उपांत्य लढतीत मेस्सीने कारकीर्दीतील ५५ वा गोल डागला. विशेष म्हणजे या सामन्यात ४-० अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवत अर्जेंटिना संघाने सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीतही
दिमाखात प्रवेश केला. पाच वेळा जगातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू होण्याची किमया साधणाऱ्या मेस्सीने ह्युस्टन येथील मैदानावर रंगलेल्या उपांत्य सामन्यात ३२ व्या मिनिटाला गोल डागून यजमान अमेरिकेविरूद्ध आपल्या संघाला २-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू गॅब्रिएल बटिस्टुटाच्या नावावर सर्वाधिक ५४ गोल्सची नोंद होती. मेस्सीने ५५ वा गोल डागून गॅब्रिएलला मागे टाकले.
विशेष म्हणजे मेस्सीचा हा विक्रमी गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. अमेरिकेच्या ख्रिस वंडोलोवस्कीच्या फाऊलमुळे मिळालेल्या फ्री किकचा फायदा उठवत ३० यार्डावरून मेस्सीने गोलकीपरला चकवा देत बॉल गोलपोस्टमध्ये डागला. सामन्याच्या सुरुवातीलाच इझेक्वील लेवेझीने सुरेख हेडरद्वारे गोल करून अर्जेंटिनाचे खाते उघडले होते. त्यानंतर दुसरा गोल मेस्सी तर उत्तरार्धात गोन्झालो हिंगून याने दोन गोल डागून अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आणले.
दरम्यान, १९९३ नंतर अर्जेंटिनाला एकदाही कोपा अमेरिका चषक जिंकता आलेला नाही. २०१५ मध्ये अंतिम सामन्यात चिलीने अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी ही अंतिम सामन्यातील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी अर्जेंटिना संघ सज्ज झाला असून मेस्सी जबरदस्त फॉर्म ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
No comments:
Post a Comment