फोर्स मोटर्सच्या चाकण येथील नवीन इंजिन प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते बुधवारी विधिवत उद्घाटन झाले. कंपनीने आखलेल्या ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या विस्तार कार्यक्रमापैकी १०० कोटींच्या गुंतवणुकीतून साकारलेला हा अत्याधुनिक प्रकल्प म्हणजे गत ४५ वर्षे जर्मन वाहन निर्मात्या मर्सिडिझ बेन्झबरोबर सुरू असलेल्या व्यावसायिक सहकार्याचा पुढचा टप्पा आहे. देशांतर्गत सुटय़ा भागांच्या
निर्मितीच्या मर्सिडिझच्या संकल्पानुसार अर्थात ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या यशाचा हा उत्तम नमुना आहे, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी काढले.
फोर्स मोटर्सकडून १९९७ पासून मर्सिडिझकडून बनविल्या जाणाऱ्या कार आणि एसयूव्हीसाठी इंजिन आणि अॅक्सलची निर्मिती केली जात आहे. आजवर असे ६० हजार इंजिन्स आणि ५० हजार अॅक्सल्सचा पुरवठा फोर्स मोटर्सने केला आहे. नव्या चाकण प्रकल्पातून वार्षिक प्रत्येकी २० हजार इंजिन आणि रिअर अॅक्सलची निर्मिती होणार असून, मर्सिडिझ बेन्झ इंडियाकडून मागणी वाढल्यास निर्मिती क्षमतेत वाढ केली जाईल, असे प्रासन फिरोदिया यांनी या प्रसंगी सांगितले.
No comments:
Post a Comment