शिवछत्रपती क्रीडानगरीत केवळ खेळाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन सहा महिन्यांपूर्वी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, या स्टेडियममध्ये होणाऱ्या स्टार स्पोर्टस प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील उदघाटनाच्या लढती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामुळे अचानक मुंबईला हलविण्यात आल्यामुळे पुणेकरांचा हिरमोड झाला आहे आणि खेळाला दुय्यम स्थान मिळाल्याची भावना
क्रीडावर्तुळात व्यक्त होत आहे.
आता हे सामने त्यांना मुंबईत जाऊन पाहावे लागतील. आयोजकांनी या तिकिटांचे पैसे परत करण्याची तयारीही दर्शविली आहे.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात क्रीडामंत्री तावडे यांनी म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत आता खेळांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले होते.
तसेच, लग्न व इतर समारंभांना हॉल दिले जाणार नाहीत, असेही स्पष्ट केले होते. मात्र, ते आश्वासन फोल ठरले आहे. शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये प्रो-कबड्डीच्या चौथ्या मोसमाला प्रारंभ होणार होता. पहिल्या टप्प्याचे यजमानपद पुण्याला मिळाले होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम २५ जूनला याच हॉलमध्ये होणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रो-कबड्डीचे सामने मुंबईला हलविण्यात आले. क्रीडा खात्याचे उपसंचालक माणिक ठोसरे म्हणाले, 'आम्ही कबड्डीचे सामने कुस्तीच्या हॉलमध्ये घेण्यासाठी सुचविले होते. बॅडमिंटन हॉलप्रमाणेच हा हॉल आहे. आसनक्षमताही तेवढीच आहे. मात्र, संयोजकांना
पर्याय पटला नाही.'
२५ ते २८ जून या कालावधीत हे कबड्डी सामने क्रीडानगरीत होणार होते. या सामन्यांचे यजमान असलेल्या पुणे संघाचे सीईओ कैलाश म्हणाले की, 'पुण्यातील चाहत्यांना हे सामने पाहता येणार नाहीत पण आम्ही ही विनंती मान्य करून सामने मुंबईत घेण्याची तयारी केली आहे. पुण्यातील चाहत्यांचे पैसे परत केले जातील.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडाआयुक्तांना पत्र लिहून म्हाळुंगे-बालेवाडीतील क्रीडा संकुल या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. सुरक्षेच्या दृष्टीने म्हाळुंगे-बालेवाडीचे क्रीडासंकुल ही अधिक योग्य जागा असल्यामुळे प्रो.-कबड्डीच्या आयोजकांना तेथे होणाऱ्या लढती अन्यत्र हलविण्यास सांगण्यात आले. त्यांनी ती विनंती मान्य केली.
No comments:
Post a Comment