कोल्हापूर – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नावाची भाजपने शिफारस राज्यसभेसाठी केली होती. ते खासदार झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी भवानी मंडप, शिवाजी पुतळा परिसरात त्यांच्या कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. काही दिवसांपासून त्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू होती. त्यावर
आजअखेर शिक्कामोर्तब झाले.संभाजीराजे यांनी लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये अपक्ष उमेदवार (कै.) खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर संभाजीराजे यांनी राजकीय पक्षांपासून अलिप्त राहत तरुणांच्या संघटनाचे काम सुरू केले. राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह विविध भागांत त्यांनी तरुणांचे मोठ्या प्रमाणात संघटन करण्याचे काम सुरू केले. रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळाही भव्यदिव्य करत लाखो तरुणांना दिशा देण्याचे काम सुरू केले. या सर्व कामाची दखल घेत भाजपने संभाजीराजे यांना खासदार करण्यासाठी प्रयत्न सुरूच केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा झाली. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या संभाजीराजे यांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणण्यापेक्षा राजर्षी शाहूंच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी थेट राष्ट्रपतींकडून नेमणूक करण्याचे ठरले. त्यानुसार आज त्यांची नियुक्ती झाल्याचे आज जाहीर करण्यात आले.
No comments:
Post a Comment