भारतात रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी अमेरिका आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मदत करील तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअरही देईल असे रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. रस्ते सुरक्षा हा भारतातील एक प्रमुख प्रश्न असल्याचे मान्य करताना त्यांनी सांगितले की, पाच लाख अपघातात दरवर्षी दीड लाख लोक मरतात अशी वस्तुस्थिती आहे. रस्ते सुरक्षेच्या समस्येत आम्ही अमेरिकी सरकारची
मदत घेत आहोत व आधुनिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. रस्ते वाहतुकीची भारतात जी स्थिती आहे त्याबाबत आपण अस्वस्थ आहोत.
अमेरिकेने भारतीय वाहतूक संकेतांचे प्रमाणीकरण करण्यासाठी तांत्रिक मदत देण्याचे मान्य केले असून रस्ते, पूल व उड्डाण पूल यासाठी नवीन मार्गदर्शिका व नियम तयार करण्यात येतील. भारतात रस्ते अपघात ही गंभीर समस्या बनली आहे. ९६ हजार किलोमीटरचे एकूण राष्ट्रीय महामार्ग असून देशातील ४० टक्के वाहतूक या दोन टक्के रस्त्यांवरून जाते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. रस्ते सुरक्षा हा अग्रक्रमाचा भाग असून आपण वाहतूक विषयावर अमेरिकेचे समपदस्थ अँथनी फॉक्स व उद्योग समुदायातील धुरिणांशी चर्चा केली असे गडकरी यांनी भारतीय पत्रकारांना सांगितले. देशांतर्गत जलमार्ग विकसित करण्यास अमेरिकेने मदत करण्याचे आश्वासन दिले असून रस्ते वाहतूक सचिव रोहित कुमार सिंग यांनी या क्षेत्रात भारतामध्ये असलेल्या गुंतवणूक संधीची माहिती दिली. सागरमला कार्यक्रमाची माहिती अतिरिक्त सचिव आलोक श्रीवास्तव यांनी दिली. भारतात नवे रस्ते, रेल्वे मार्ग व विमानतळ यांच्या विकसनासाठी १ ट्रिलियन डॉलर्सची गरज आहे व अमेरिकी कंपन्यांनी भांडवलात व तंत्रज्ञानातही वाटा उचलावा असे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment