इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन याला नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिकेच्या जोडीने २००३मध्ये युद्धात उतरण्याचा तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचा निर्णय चुकीचा व चुकीच्या गुप्तचर अहवालांवर आधारित होता, असा ठपका चौकशी आयोगाने ठेवला आहे. सात वर्षांच्या चौकशीनंतर बुधवारी १२ खंडांचा हा अहवाल जाहीर झाला. युद्धापूर्वी शांततापूर्ण मार्गाची चाचपणी आवश्यक होती. ती झालीच नाही. इतकेच नव्हे तर
इराकमध्ये सामूहिक नरसंहारक अस्त्रे असल्याची खबरही अतिशयोक्त होती. लष्करी कारवाई हा त्यावेळचा अनिवार्य उपाय नव्हता, असे आयोगाचे अध्यक्ष आणि ब्रिटनचे निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी जॉन चिल्कॉट यांनी नमूद केले आहे. २००९मध्ये तत्कालीन पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी हा आयोग नेमला होता. २००३ ते २००९ या कालावधीत झालेल्या इराक युद्ध व कारवाईत १८० ब्रिटिश सैनिक मारले गेले.
अहवालावर प्रतिक्रिया देताना ब्लेअर म्हणाले की, जर काही चूक झाली असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. पण निदान आमची कारवाई चुकीच्या माहितीवर झाली आम्ही योग्य माहिती असूनही चुकीची कारवाई केलेली नाही, हे आयोगानेच स्पष्ट केले आहे. तरीही आमच्या सैनिकांच्या जीवितहानीचे मलाही दु:ख आहे.
No comments:
Post a Comment