ब्रिटनच्या गृहमंत्री तेरेसा मे यांनी हुजूर पक्षात मावळते पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठीच्या निवडणुकीची पहिली फेरी जिंकली आहे. तेरेसा मे या सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या व त्यांना पहिल्या फेरीत १६५ मते मिळाली आहेत. पहिल्या बाद फेरीत त्यांनी लियाम फॉक्स यांना हरवले. फॉक्स यांना सोळा मते पडली. कर्मचारी व निवृत्ती वेतन मंत्री स्टीफन क्रॅब यांना ३४ मते पडली असून ते शर्यतीतून
माघार घेणार आहेत. त्यांनी तेरेसा मे यांना पाठिंबा दिला आहे. आजच्या विजयाने तेरेसा मे यांना आनंद झाला आहे.
फॉक्स यांनीही मे यांना पाठिंबा दिला असून त्या चांगल्या पंतप्रधान ठरतील असे म्हटले आहे. मे म्हणाल्या की, पंतप्रधानपदासाठी मीच लायक आहे कारण मला हुजूर पक्षातून मोठा पाठिंबा आहे व माझी क्षमताही मोठी आहे. आता ऊर्जामंत्री अँड्रिया लीडसोम व न्यायमंत्री मायकेल गव्ह हे अनुक्रमे ६६ व ४८ मते मिळवून स्पर्धेत आहेत. त्यांनी ब्रेग्झिटच्या बाजूने प्रचार केला होता. मतदानाची दुसरी फेरी आता गुरुवारी होणार आहे. ब्रेग्झिटमधील जनमतात पराभव झाल्याने कॅमेरॉन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. ब्रेग्झिटवर ५२ विरुद्ध ४८ टक्के असे मतदान झाले होते. हुजूर पक्षाच्या ३३० खासदारांनी उत्तराधिकारी निवडीच्या मतदानात भाग घेतला असून ९ सप्टेंबपर्यंत कॅमेरॉन यांचे उत्तराधिकारी सत्ताग्रहण करतील.
No comments:
Post a Comment