लिओनेल मेस्सी आणि ऑस्कर पिस्टोरियस या क्रीडा जगतातील दोन दिग्गज खेळाडूंना बुधवारी न्यायालयाने दणका दिला. आपापल्या क्षेत्रात नैपूण्यपूर्ण कामगिरी करून चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या खेळाडूंना वेगवेगळ्या घटनेत न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.बार्सिलोनाचा अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सी आणि त्याच्या वडिलांना स्पेनच्या न्यायालयाने करचुकवल्या प्रकरणी २१ महिन्यांचा करावास
आणि ४१ लाख डॉलरचा दंड सुनावला आहे. मात्र ही शिक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. प्रथमच अहिंसात्मक गुन्हृाात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीची शिक्षा रद्द होण्याचा नियम स्पेनमध्ये आहे. त्यामुळे मेस्सीला दिलासा मिळू शकतो. २००७ ते २००९ या कालावधीत कमावलेल्या रकमेवरील कर चुकवण्यासाठी मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज होरॅको मेस्सी यांनी विविध देशांमध्ये बनावटी कंपनी स्थापन करून कर चुकवल्याचा ठपका बार्सिलोनाच्या दिग्गज फुटबॉलपटूवर ठेवण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पॅरालिम्पियन ऑस्कर पिस्टोरियसला प्रेयसी रीव्हा स्टीनकॅम्पच्या हत्येप्रकरणी सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑस्करने तीन वर्षांपूर्वी आपल्या राहत्या घरी रीव्हाचा चार गोळ्या झाडून खून केला होता. या हत्येने जगभरात खळबळ उडाल्याने सर्वाचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. काही विशिष्ट घटकांचा विचार करून पिस्टोरियसला खुनाबद्दल किमान १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली नाही, असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती थोकोझिले मसिपा यांनी सुनावणीप्रसंगी सांगितले.
No comments:
Post a Comment