चीन आणि फिलिपाइन्समध्ये चाललेला दक्षिण चीनच्या समुद्रावरील हक्काचा लढा अखेर फिलिपाइन्सने जिंकला आहे. या समुद्रावर हक्क सांगण्यासाठी चीनकडे ठोस असे कोणतेही पुरावे नाहीत, असे मत नोंदवत आंतरराष्ट्रीय लवादाने चीनला झटका दिला. दरम्यान, या निकालानंतर फिलिपाइन्समध्ये विजयोत्सव साजरा केला जात असून राजधानी मनीलातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली. चीन आणि फिलिपाइन्समध्ये बऱ्याच
काळापासून दक्षिण चीन समुद्राच्या मालकीचा वाद सुरू होता. त्यात चीनने हा समुद्र आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि देशासाठी त्याचं ऐतिहासिक महत्त्वही मोठं आहे, असा दावा नेहमीच केला होता. त्यामुळेच फिलिपाइन्सने २०१३ मध्ये द हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाचे दार ठोठावले होते. मात्र चीनने या खटल्यात सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रथमच लवादाने चीनचे दावे फेटाळून लावत फिलिपाइन्सच्या बाजूने निकाल दिला आहे.
चीनने फिलिपाइन्सच्या किनाऱ्यापासून १४० मैल क्षेत्रावर कब्जा केला आहे, असा मुख्य आरोप या दाव्यात करण्यात आला होता. हा दावा विशेष लवादाने मान्य केला आहे.
दरम्यान, अमेरिका आणि जपानने आधीपासूनच लवादाचा निर्णय चीनसह सर्व संबंधित देशांनी स्वीकारायला हवा, असे नमूद केले होते. त्यात आता निकाल चीनच्या विरोधात गेल्याने या वादाला वेगळे वळण लागण्याचीही चिन्हे आहेत. चीनने हा निकाल लगेचच अमान्य केला आहे. चीनच्या शिन्हुआ न्यूज एजन्सीने हा निकाल बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. हा चीनच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकार या लवादाला नाही, अशी आक्रमक भूमिकाही चीनने घेतली आहे.
No comments:
Post a Comment