उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने राज बब्बर यांच्यावर सोपवली आहे. बब्बर यांची काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या इम्रान मसूद यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
काँग्रेसने उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी सुरु केली केल्याचे हे संकेत असल्याचे मानले जात आहे. बब्बर यांच्याआधी निर्मल खत्री राज्यातील पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी सोमवारीच या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, बब्बर यांच्या नावाची घोषणा करण्याआधी आझाद यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. आझाद यांनी घेतलेल्या भेटीनंतर उत्तर प्रदेशमधील निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
राज बब्बर उत्तराखंडमधून राज्यसभेवर गेले असले तरी ते जन्माने उत्तर प्रदेशचे आहेत. राज्यातून त्यांनी ३ वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचे, आझाद यांनी सांगितले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment