शनीचा सर्वांत मोठा उपग्रह टायटनवर पाणीविरहित जीवसृष्टी असावी, अशी शक्यता कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी वर्तवली आहे. त्यामुळे द्रवरूप पाणीच जीवसृष्टीसाठी आवश्यक असते, या समजालाही धक्का लागण्याची शक्यता आहे. टायटनच्या वातावरणात हायड्रोजन सायनाइड नावाचे संयुग अस्तित्वात आहे. हे रसायनच जीवसृष्टीसाठी कारक ठरू शकते, असा संशोधकांचा अंदाज असल्याचे वृत्त झिन्हुआ या चिनी
वृत्तसंस्थेने दिले आहे. नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स या नियतकालिकाच्या ताज्या अहवालात याबाबतचा लेख आहे.
टायटनच्या पृष्ठभागावरील हायड्रोजन सायनाइडची रासायनिक अभिक्रिया होऊन त्यापासून शृंखलायुक्त रसायने किंवा पॉलिमर तयार होत असावेत. यापैकीच एक पॉलिमर म्हणजे पॉलिमाइन, असे यापूर्वीच्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. नासाच्या कॅसिनी आणि हायजेन्स या मोहिमांतील संशोधकांच्या संशोधनात असे दिसून आले होते, की टायटनसारख्या थंड वातावरणात पॉलिमाइन लवचिक असते आणि ते सूर्याची ऊर्जा शोषू शकते. त्यामुळे ते जीवसृष्टीसाठी उत्प्रेरक बनू शकते. टायटनचा पृष्ठभाग अत्यंत थंड आहे. त्यावर पाण्याऐवजी मिथेन आणि इथेन हे वायू द्रवरूपात पसरले आहेत. त्याभोवतालच्या पिवळसर दाट वातावरणात नायट्रोजन आणि मिथेन वायू आहेत. सूर्यकिरण या विषारी भागापर्यंत पोहोचल्यानंतर तेथे रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि हायड्रोजन सायनाइड तयार होते. टायटन आणि पृथ्वी यांच्यात अनेक साम्यस्थळे आहेत. टायटनवरील हवामान राहण्यायोग्य नसले, तरीही तेथे पृथ्वीप्रमाणेच तलाव, नद्या आणि समुद्र आहेत. तेथे पाऊसही पडतो आणि परिणामी भूस्तराची झीजही होते, असे शोधनिबंधात म्हटले आहे.
हा शोधनिबंध म्हणजे सुरुवात आहे. आम्ही पृथ्वीपलीकडील जीवसृष्टीपूर्व रसायनस्थितीचा अभ्यास करीत आहोत. तो सुरूच ठेवण्याची गरज आहे; तसेच काळाच्या ओघात रासायनिक स्थिती कशी उत्क्रांत होते, हे समजून घ्यावे लागणार आहे. पुढील मोहिमेची पूर्वतयारी म्हणून आम्ही याकडे पाहात आहोत.
No comments:
Post a Comment