केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला आणि अवजड उद्योग राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वर यांनी मंगळवारी पदांचा राजीनामा दिला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोघांचाही राजीनामा स्वीकारला आहे. अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे आता या खात्याचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळाची संख्या आता ७७ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरापूर्वी
मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल केले, तेव्हाच हेपतुल्ला आणि सिद्धेश्वर यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. पंतप्रधानांनी मंत्र्यांसाठी ७५ वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार, हेपतुल्ला यांनी नुकतीच ७५ वर्षे पूर्ण केल्याने त्यांचा राजीनामा निश्चित होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाला, तेव्हा रमझान सुरू असल्याने त्यांचा राजीनामा पुढे ढकलण्यात आला होता. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अन्य पाच राज्यमंत्र्यांसोबतच सिद्धेश्वर यांचाही राजीनामा अपेक्षित होता; मात्र संपर्कातील गोंधळामुळे त्यांचा राजीनामा टळला होता. सुमार कामगिरीमुळेच सिद्धेश्वर यांचे मंत्रिपद गेल्याचे मानले जात आहे.
नागरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन या खात्यांचा कार्यभार सांभाळण्यात कमी पडलेले राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्याकडून ही खाती काढून घेण्यात आली असून, त्यांच्याकडे कमी महत्त्वाच्या अवजड उद्योग खात्याचे राज्यमंत्रिपद सोपवण्यात आले.
मिश्रांना तूर्त अभय
लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्रा यांनीही वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होईपर्यंत त्यांना अभय देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुका झाल्यानंतर मिश्रा यांचेही मंत्रिपद जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
No comments:
Post a Comment