उत्तराखंड सरकारनं राज्य पोलिसांच्या 'शक्तिमान' या घोड्याचा पुतळा विधानसभा मार्गावरून हटवला आहे. हा घोडा अशुभ असून पुढील विधानसभा निवडणुकीत अपशकून करू शकतो, असा सल्ला ज्योतिषानं दिल्यानं मुख्यमंत्री हरीश रावत यांनी तो हटवल्याची चर्चा आहे. भाजपच्या एका आंदोलनादरम्यान आमदार गणेश जोशी यांनी 'शक्तिमान' घोड्याला बेदम मारहाण केली होती. मारहाणीत जायबंदी झालेल्या या घोड्याचा पाय कापावा
लागला होता. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त झाली होती. कालांतरानं 'शक्तिमान'ला कृत्रिम पाय लावण्यात आला. मात्र, त्याचा जीव वाचू शकला नाही. २० एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला.
'शक्तिमान'ची आठवण म्हणून डेहराडून विधानसभा मार्गावर त्याचा पुतळा उभारण्यात आला होता. तसंच, या ठिकाणाला 'शक्तिमान पार्क' असं नावही देण्यात आलं होतं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत आज या पुतळ्याचं अनावरण करणार होते. मात्र, काल रात्रीच तो पुतळा हटवण्यात आल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
घोड्याला मारहाण करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांनी 'शक्तिमान'वरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. रावत यांनी स्वत: विधानसभेत प्रस्ताव आणून 'शक्तिमान'चा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. मग आता ते माघार का घेत आहेत, असा सवाल जोशी यांनी केला. तर, 'शक्तिमान'वरून राजकारण होऊ नये म्हणूनच आम्ही पुतळा हटवल्याचं रावत यांनी म्हटलं आहे. 'आम्ही त्यावेळी स्मारक बनविण्याचा निर्णय घेतला होता, आता नवं सरकार हे काम पुढं नेईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment