ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली वाघीण ‘माया’ पोटच्या बछडय़ाला कवेत घेत असल्याचा अप्रतीम क्षण कॅमेराबध्द करणारे येथील हौशी वन्यजीव छायाचित्रकार अमोल बैस यांचे छायाचित्र टपाल तिकीटावर झळकणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढाकार घेऊन भारतीय पोस्टखात्याला तसा प्रस्ताव पाठविणार आहे. लवकरच केंद्रातूनही यावर शिक्कामोर्तब होणार आहे.येथील बाजार वार्ड प्रभागातील
अमोल बैस यांचा वनभ्रमंती हा आवडता छंद. वाघ, बिबटय़ासह अनेक वन्यप्राण्यांची छायाचित्रे त्यांनी टिपलेली आहेत. मुळात मुख्याध्यापक असलेले बैस सातत्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह कन्हाळगाव, मध्यचांदा वन विभागात भ्रमंतीवर असतात. ताडोबा प्रकल्पात १ जानेवारी २०१६ रोजी व्याघ्र भ्रमंतीवर असतांनाच पांढरपौनी येथे ‘माया’ ही वाघीण पोटच्या बछडय़ाला प्रेमाने कुरवळत होती. नेमका हा अप्रतीम क्षण बैस यांनी अलगदपणे कॅमेराबध्द केला. या छायाचित्राकडे वन्यजीवांमधील आजवरचे अतिशय दुर्मीळ छायाचित्र म्हणून पाहिले जात आहे. हे छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल होताच त्याला २५ हजारांवर लाईक्स आणि असंख्य नेटकरींनी शेअर केले आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या ‘डेली मिरर’ मध्येही ते प्रसिध्द झाले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापासून, तर अनेक मान्यवरांना या छायाचित्राची प्रतिकृती भेट स्वरूपात दिली. देशविदेशातही अनेकांनी या छायाचित्राचे कौतूक करतांना घरातील भिंतीवर प्रतिकृती लावण्यास पसंती दर्शविली. आज असंख्य बंगल्यांमध्येही ते पोहोचलेले आहे.
दरम्यान, भारतीय पोस्ट खातेही या छायाचित्राच्या प्रेमात पडले असून लवकरच टपाल तिकीटावर ते झळकणार आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या छायाचित्राची भारतीय पोस्ट खात्याकडे शिफारस केल्याचे सांगितले होते. त्यानंतर केंद्रीय पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनीही यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू केला असून लवकरच हे छायाचित्र टपाल तिकीटावर दिसणार आहे. विशेष म्हणजे, माया ही वाघीण सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने अवघ्या वष्रेभराच्या बछडय़ाला स्वत:पासून वेगळे सोडले आहे. साधारणत: वाघिणीचा बछडा दोन वर्षांनंतर आईपासून दूर जातो. मात्र, येथे प्रथमच मायाने वष्रेभरातच त्याला सोडल्यामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. सध्या तिच्या आणि ‘गब्बर’च्या प्रेमकथांचीही चर्चा व्याघ्र प्रकल्पात चांगलीच रंगलेली आहे. जगप्रसिध्द झालेली ही वाघीण आता टपाल तिकीटावर झळकणार असल्याने ताडोबातील वाघांची प्रसिध्दी सातासमुद्रापार होणार आहे.
No comments:
Post a Comment