बी. साई प्रणीत आणि रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या मनू अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी यांनी कॅनडा खुल्या ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पध्रेत अनुक्रमे पुरुष एकेरी व दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले. चौथ्या मानांकित २३ वर्षीय प्रणीतने कोरियाच्या ली ह्यूनचा २१-१२, २१-१० असा अवघ्या २८ मिनिटांत धुव्वा उडवत पुरुष एकेरीत दिमाखदार विजय मिळवला. अव्वल मानांकित मनू व रेड्डी या जोडीने स्थानिक खेळाडू अॅड्रियन लियू व टोबी
नग या जोडीवर २१-८, २१-१४ असा विजय मिळवला. ऑलिम्पिकसाठी पहिल्यांदा भारताचा पुरुष दुहेरी पात्र ठरला असून मनू व रेड्डी यांनी हा मान पटकावला. या विजयाने त्यांना ऑलिम्पिकमध्ये सातत्यपूर्ण खेळ करण्याची प्रेरणा मिळेल. जागतिक क्रमवारीत ३७व्या स्थानावर असलेल्या प्रणीतने पहिल्या गेममध्ये १०-२ अशी आघाडी मिळवून तिसऱ्या मानांकित लीवर दडपण निर्माण केले होते आणि आघाडीत भर टाकताना प्रणीतने पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ८-० अशी आघाडी घेत प्रणीतने जेतेपदावरील दावेदारी भक्कम केली. त्यानंतर कोरियाच्या खेळाडूला दहा गुणांवरच समाधान मानण्यास भाग पाडत प्रणीतने २१-१० अशी बाजी मारली. शनिवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात ली याने भारताच्या अजय जयरामवर २१-९, २१-८ असा, तर प्रणीतने फ्रान्सच्या ब्रिस लेव्हेडरेवर २२-२०, १९-२१, २१-१२ असा विजय मिळवला होता.
दुखापत आणि सातत्याच्या अभावामुळे प्रणीतला गेल्या काही वर्षांत अनेक स्पर्धाना मुकावे लागत होते. मात्र, यातही त्याने काही उल्लेखनीय विजय मिळवले आहेत. ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पध्रेत २००३ मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या मोहम्मद हाफिज हाशिमला (मलेशिया) त्याने त्याच वर्षी थायलंड खुल्या ग्रां. प्रि. स्पध्रेत पराभूत केले होते. त्याच वर्षी इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत माजी विश्व आणि ऑलिम्पिक विजेत्या तौफिक हिदायत (इंडोनेशिया) याच्यावरही विजय मिळवला होता. या वर्षी पार पडलेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पध्रेत प्रणीतने दोन वेळा ऑलिम्पिक रौप्य पदक जिंकणाऱ्या ली चोंग वेईचा धुव्वा उडवला. तरीही जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली, परंतु सोमवारी त्याने ही कमी भरून काढली.
कॅनडा ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या बी साई प्रणीत आणि मनू अत्री व सुमिथ रेड्डी या जोडीला अमेरिकन खुल्या ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद खुणावत आहे.
No comments:
Post a Comment