देशातील सेवा क्षेत्राची वाढ जूनमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घसरली. नव्या व्यवसाय मागणीला प्रतिसाद नसल्याने हे क्षेत्र जूनमध्ये ५०.३ अंशांवर म्हणजे सात महिन्यांच्या खोलात शिरले आहे. मार्च २०१६ मध्ये ५४.३ पर्यंत विस्तारल्यानंतर एप्रिल २०१६ पासून ते सातत्याने घसरले आहे. वर्षभरापूर्वी, जून २०१५ मध्येही ते ५०च्या खाली, ४७.७ पर्यंत होते. जुलै २०१५ पासून ते ५० टक्क्यांच्या वर राहिले आहे.
मंगळवारी जाहीर झालेला जूनमधील ५०.३ हा निक्केई सेवा व्यवसाय कृती निर्देशांकाचा (मार्किट) वर्षभरातील दुसरा नीचांक स्तर आहे. त्याचे ५० टक्क्यांवरील परिमाण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे लक्षण मानले जाते. सेवा क्षेत्राची आकडेवारी जाहीर करताना ‘मार्किट’चे अर्थतज्ज्ञ पॉलिआना डि लिमा म्हणाल्या की, निर्मिती क्षेत्र तुलनेने वाढले असले तरी व्यवसाय मागणी, रोजगाराबाबत चित्र चांगले नाही.
निराशादायी निर्देशांकामुळे अर्थव्यवस्थेबाबत उद्योगातून चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे रिझव्र्ह बँकेच्या आगामी पतधोरणात व्याजदर कमी करण्याबाबत साशंकता व्यक्त केली गेली आहे. रिझव्र्ह बँकेचे पतधोरण येत्या ऑगस्टमध्ये जाहीर होईल. यापूर्वीच्या जूनच्या पतधोरणात गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्याजदर स्थिर ठेवले होते. वाढत्या महागाईचे समर्थन त्यासाठी करण्यात आले होते.
जुलैपासून सुरू झालेल्या दमदार मान्सूनच्या जोरावर महागाई कमी होण्याची शक्यता असून ऑगस्टनंतर व्याजदर कपात होईल, अशी अटकळ विविध अर्थतज्ज्ञ, दलाल पेढय़ांनी बांधली आहे. २०१५-१६ मध्ये देशाचा विकास दर ७.६ टक्के असा गेल्या पाच वर्षांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचला आहे, तर याच आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत तो ७.९ टक्के राहिला आहे.
No comments:
Post a Comment