Tuesday 19 July 2016

काळा पैसा ‘अभय’ योजनेला अखेर मुदतवाढ!

करबुडव्यांना सप्टेंबर २०१७ पर्यंत कर व दंडाची रक्कम भरण्याची मुभा उद्योग महासंघांकडून केल्या गेलेल्या मागणीप्रमाणे काळ्या पैशावर दंड आणि कराची रक्कम भरून अभय मिळविण्याच्या योजनेला अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केला. आता काळे पैसेवाल्यांना त्यांच्या अघोषित संपत्तीवर ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत तीन हप्त्यांत कर व दंड भरण्याची मुभा दिली गेली आहे. यंदाच्या
अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे ‘उत्पन्न प्रकटन योजना २०१६’नुसार काळ्या पैशासंबंधाने स्वेच्छेने खुलासा करण्यासाठी १ जून ते ३० सप्टेंबर असा चार महिन्यांचा कालावधी, तर या अघोषित संपत्तीवर ४५ टक्के कर व दंडाची रक्कम भरून अभय मिळविण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१६ अशी निश्चित करण्यात आली होती. सुधारित तरतुदीनुसार अघोषित संपत्तीवरील दंडाचा पहिला हप्ता म्हणजे एकूण संपत्तीच्या २५ टक्के रक्कम नोव्हेंबर २०१६ पर्यंत भरावी लागेल. दुसरा २५ टक्के दंडाचा हप्ता मार्च २०१७ पर्यंत आणि उर्वरित ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत सरकारी तिजोरीत जमा करावा लागेल. देशांतर्गत काळ्या संपत्तीवर कर, त्यावरील अधिभार आणि दंडाची रक्कम भरणे व्यावहारिकदृष्टय़ा अडचणीचे आणि त्यासाठी योजनेने उपलब्ध केलेल्या चार महिन्यांचा कालावधी खूपच त्रोटक असल्याचे या संबंधाने देशभरात सुरू असलेल्या जनजागृती सभांमधून अभिप्राय पुढे येताना दिसला. अनेकांकडून व्यक्त झालेली भावना विचारात घेऊनच मुदतवाढीचा हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. उद्योग संघांकडूनच मागणी.. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उद्योग महासंघ, सनदी लेखाकार आणि कर व्यावसायिकांची या योजनेच्या यशस्वितेसंबंधाने बैठक बोलाविली होती, त्या वेळीही कर-भरणा करण्यासाठी अधिक काळ दिला जावा, अशी मागणी पुढे आली. ती स्वीकारली गेल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले. 

No comments:

Post a Comment