Tuesday 19 July 2016

‘यूएएन’शिवायही कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’ची रक्कम मिळविणे शक्य

भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने १ जानेवारी २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ खात्यांतील रक्कम काढून घेण्यासाठी सार्वत्रिक खाते क्रमांक (यूएएन) मिळविले असणे आवश्यक करणारे बंधन शिथिल केले असल्याचे गुरुवारी जाहीर केले. पीएफच्या रकमेवर दाव्यासाठी अर्ज दाखल करताना, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हा खाते क्रमांक नोंदविणे गतवर्षी डिसेंबरमध्ये
झालेल्या निर्णयाप्रमाणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु सर्वच कर्मचाऱ्यांनी हा खाते क्रमांक मिळविला नसल्याचे हे बंधन काढून टाकण्यात येत असल्याचे ईपीएफओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवृत्तीची तारीख आणि पर्यायाने भविष्य निधी संघटनेचे सदस्यत्व संपुष्टात आल्याची तारीख ही १ जानेवारी २०१४ पूर्वीची असल्यास अशा अर्जाचा दावा ‘यूएएन’ क्रमांक नसला तरी मंजूर करून, पीएफची रक्कम अदा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जुलै २०१४ पासून आजवर सार्वत्रिक खाते क्रमांक (यूएएन) मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या चार कोटींहून अधिक झाली आहे. यूएएनद्वारे आपले पीएफ खाते आधार क्रमांक, बँक खाते क्रमांकाशी संलग्न करून, कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातील व्यवहार ऑनलाइन स्वरूपात करण्याची सुविधा सुरू करण्यात आली असून, पीएफ रकमेवरील दावाही विनाविलंब थेट बँक खात्यात वर्ग होण्याची सोय कर्मचाऱ्यांना मिळविता आली आहे. पीएफचा सार्वत्रिक खाते क्रमांक कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, एका राज्यातून अन्यत्र स्थलांतर केले तरी त्याच्या संपूर्ण सेवा काळात कायम राहतो, हाही एक अतिरिक्त फायदा आहे.

No comments:

Post a Comment