Tuesday 19 July 2016

राज्यसभा, भाजपचा सिद्धू यांचा राजीनामा


नवी दिल्ली - भाजपने राज्यसभेवर आणलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी जेमतेम महिनाभरातच खासदारकीवर पाणी सोडले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जबरदस्त धक्का बसला आहे. सिद्धू आम आदमी पक्षात (आप) प्रवेश करतील व त्या पक्षातर्फे त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केले जाईल, अशी दाट चिन्हे आहेत. सिद्धू यांनी भाजप सदस्यत्वही सोडले आहे.
सिद्धू यांनी आज दुपारी आपला राजीनामा राज्यसभाध्यक्षांकडे पाठविला. त्यांनी तो स्वीकारल्याची अधिकृत घोषणा दुपारी चार वाजता करण्यात आली. सिद्धू यांनी राजीनामा देण्याचे ठरविताच सत्तारूढ पक्षातर्फे त्यांचे मन वळविण्याचे निकराचे प्रयत्न सुरू होते. भाजप नेतृत्वासह पक्षाचे पंजाब प्रभारी प्रभात झा यांनी याबाबत साम-दाम-दंड-भेद ही सारी आयुधे वापरली. मात्र सिद्धू यांनी कोणालाच दाद दिली नाही. भाजपचे प्रचारप्रमुख करण्याची लालूचही त्यांनी धुडकावली. आज खासदारकीच्या राजीनाम्याबाबतही त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. अकाली दलाशी काडीमोड घ्या, ही सिद्धूंची मुख्य मागणी मान्य करण्याच्या मनस्थितीत भाजप नेतृत्व नाही. महाराष्ट्रात शिवसेना डोळ्यांसमोरही नको असलेले भाजप नेतृत्व अकाली दालचे वर्णन "मोठा भाऊ‘ असे करते. अकाली दलापासून दूर होण्यास भाजप तयार नाही, हे लक्षात येताच सिद्धू यांनी वेगळी वाट निवडण्याचे ठरविले.

मागील लोकसभेत भाजपतर्फे अमृतसरमधून निवडून आलेले सिद्धू यांचे तिकीट लोकसभा निवडणुकीवेळी अरुण जेटली यांच्यासाठी भाजपने कापले. त्यानंतर ते प्रचंड नाराज झाले. मात्र त्यांनी भाजपच्या विरोधात कधीही वक्तव्य केले नाही. या राज्यात भाजपने अकाली दलाबरोबर युतीत राहण्यास सिद्धू व त्यांच्या पत्नींचा कडाडून विरोध आहे. त्यातूनच "आप‘ने सिद्धू यांना जाळ्यात ओढण्याची धडपड चालविल्याचे सांगितले जाते. पुढील वर्षी निवडणूक होणाऱ्या पंजाबमध्ये सध्या "आप‘ला अनुकूल वातावरण आहे. खुद्द अरविंद केजरीवाल पंजाबबाबत इच्छुक असल्याचे सांगितले जाते, मात्र त्या पक्षाने बालिशपणे आपल्याच जाहीरनाम्याची तुलना "गुरू ग्रंथसाहिब‘बरोबर केल्यानंतर "आप‘विरुद्ध प्रक्षोभ निर्माण झाला होता. त्यामुळे पंजाबमध्ये "आप‘ला एक लोकप्रिय चेहरा हवा आहे व सिद्धू यांच्या रूपाने तो मिळाल्यास पंजाबमध्ये "आप‘ आणखी सुस्थितीत येईल, असे सांगितले जाते.

No comments:

Post a Comment