Tuesday 19 July 2016

नवोद्योगांच्या प्रवर्तनात आता इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णनही

उद्योगजगतातील अनेक बडय़ा धुरिणांनी निवृत्तीपश्चात सुरू केलेल्या उपक्रमांची री ओढत, देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रणेती इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांनीही नवीन उद्यम कल्पना घेऊन पुढे येणाऱ्या नवोद्योगांच्या (स्टार्टअप्स) प्रवर्तन व घडणीस हातभार लावणाऱ्या उपक्रमात सहभाग घेतला आहे. नवोद्योगांना फळण्या-फुलण्यास उपयुक्त परिसंस्था प्रदान करणारे सिलिकॉन
व्हॅलीतील यशस्वी मॉडेलच्या धर्तीवर ‘गॅरेज’ नावाच्या याच नावाने मुंबईतील प्रवर्तन केंद्राची (इनक्युबेशन सेंटर) त्यांनी शुक्रवारी घोषणा केली. गोपालकृष्णन यांच्या सहभागाने सुरू झालेल्या जेटसिंथेसिस प्रा. लि. या कंपनीने ‘गॅरेज’नामक पहिले केंद्र मुंबईच्या लोअर परळ या मध्यवर्ती भागात सुरू केले असून, उद्यमशील नवकल्पनेला तंत्रज्ञान ते डिझाइन, मनुष्यबळ, बाजारपेठ, कायदेशीर सल्ला व विपणनविषयक मार्गदर्शन ते भांडवलापर्यंत आवश्यक ते सर्व पाठबळ पुरविणारी ही संकल्पना असल्याचे गोपालकृष्णन यांनी सांगितले. एकाच ठिकाणी अनेक नवोद्योग जरी उद्यम संकल्पना वेगवेगळ्या असल्या तरी मूलभूत पायाभूत सोयीसुविधा सामाईकपणे वापरून, सहयोग आणि एकत्रितपणे काम करण्याचे गॅरेज हे आदर्श व्यासपीठ असेल, असे जेटसिंथेसिसचे उपाध्यक्ष राजन नवानी यांनी सांगितले. सर्जनशीलता, नावीन्यतेचा ध्यास, ध्येयवेडय़ा मंडळींना त्यांची व्यावसायिक संकल्पना प्रत्यक्ष साकारून नव्या उंचीवर नेण्यासाठी मदतीचा हात कायम तत्पर असेल, असे त्यांनी सांगितले. १७० आसन क्षमता असलेल्या लोअर परळस्थित गॅरेजमध्ये सध्या वेगवेगळ्या १० क्षेत्रांतील नवोद्योगांनी मूळ धरले असून, नोकरी शोधून अॅप ते चुटके-विनोद-कोटय़ा करून हसविणारे बहुभाषिक अॅप, ऑनलाइन वैद्यक सल्ला, पियर टू पियर कर्जसाहाय्य, फॅशन स्टोअर, इंटरनेट वार्तापत्र, क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडींशी प्रेक्षकांना जोडणाऱ्या वाहिन्यांच्या उपक्रमाचा समावेश आहे. ‘गॅरेज’चा वस्तुपाठ अन्यत्रही गिरविला जाईल देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पहिले केंद्र सुरू झाले असून, देशाच्या अन्य भागांत असे अनेक ‘गॅरेज’ जेटसिंथेसिसकडून सुरू केले जातील. नवोद्योगांना फळण्या-फुलण्यास उपयुक्त परिसंस्था प्रदान करणारे सिलिकॉन व्हॅलीतील यशस्वी मॉडेलचे हे प्रतिरूप आहे. 

No comments:

Post a Comment