‘आयएमएफ’कडून धोक्याचा इशारा ब्रिटनचा युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घातक असून त्यामुळे ब्रिटन व युरोपीय महासंघच नव्हे, तर सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेत अनिश्चितता येईल, असा धोक्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. दरम्यान मध्यवर्ती बँकेने दिलासा दिल्यामुळे आशियात तेलाचे भाव पुन्हा वाढले आहेत. नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राइस यांनी सांगितले, की ब्रेग्झिटमुळे जगाच्याच आर्थिक वाढीला
खीळ बसणार आहे. त्यामुळे धोरणकर्त्यांनी निर्णायक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. ब्रेग्झिटमुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे धोरणकर्त्यांनी अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी उपाययोजना करण्यास सज्ज असावे. ग्राहक व उद्योजक यांच्यातील विश्वास कमी होणार असून ब्रिटन व युरोपीय महासंघातील धोरणकर्त्यांना त्यांचे कौशल्य पणास लावावे लागेल. राइस यांनी सांगितले, की ब्रिटन व युरोपीय महासंघ यांच्यात स्थूल आर्थिक घटकांमुळे परिणाम होत असून त्याचे पडसाद राजकीय आघाडीवरही उमटणार आहेत. ब्रिटन व युरोपीय समुदाय यांच्यातील संबंध यात महत्त्वाचे राहतील, त्यातून उद्योगांवर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. युरोपीय महासंघ व ब्रिटन यांच्यातील काडीमोड सुकर व्हावा यासाठी नाणेनिधीने मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. बँक ऑफ इंग्लंड, युरोपीय सेंट्रल बँक, यूएस फेडरल रिझव्र्ह, बँक ऑफ जपान हे तरलता आणण्यास निधी देण्याकरिता तयार असून त्यामुळे भीती कमी होईल. युक्रेन युरोपीय महासंघात येणार दरम्यान, युक्रेनचे पंतप्रधान व्लादिमीर ग्रॉसमन यांनी सांगितले, की आमचा देश येत्या दहा वर्षांत युरोपीय महासंघात सामील होईल. आमच्या देशातील सुधारणांना त्यांनीच दिशा दाखवली आहे. ब्रिटनने ब्रेग्झिटचा जो निर्णय घेतला तो चुकीचा होता. युरोपातील बेरोजगारीचा पाच वर्षांतील नीचांक युरोझोनमध्ये बेरोजगारी पाच वर्षांतील सर्वात कमी असल्याची माहिती हाती आली आहे. युरोपीय अर्थव्यवस्था फार जोमाने पुढे जात नाही अशी तक्रार असताना हे निष्कर्ष आशा पल्लवित करणारे आहेत. ब्रेग्झिटच्या आधीच्या काळातील पाहणीचे हे निष्कर्ष असून त्यात १९ देशांच्या युरोझोनमध्ये बेरोजगारी मे महिन्यात १०.१ टक्के झाली, जी एप्रिलमध्ये १०.२ टक्के होती. कॅपिटल इकॉनॉमिक्सचे युरोपीय अर्थतज्ज्ञ स्टीफन ब्राऊन यांनी सांगितले की, मे मध्ये बेरोजगारीचा दर युरोझोनमध्ये कमी झाला असला तरी १९९९-२००७ मध्ये तो ८.८ टक्के इतकाच होता. पूर्ण युरोपीय महासंघाचा विचार केला, तर २८ देशात फेब्रुवारीत ८.६ टक्के बेरोजगारी होती असे युरोस्टॅटने म्हटले आहे. जर्मनीत बेरोजगारी कमी असून ते प्रमाण ४.२ टक्के आहे, तर कर्जाने खचलेल्या ग्रीसमध्ये ते २४.१ टक्के, तर स्पेनमध्ये १९.८ टक्के होते. आता युरोझोनमधील कंपन्या नोकरभरती करणार नाहीत अशी चिन्हे आहेत. २०१५ मध्ये युरोपीय मध्यवर्ती बँकेने बेरोजगारी हटवण्यासाठी पॅकेज देऊनही फार उपयोग झाला नव्हता. त्यामुळे गेल्या महिन्यात आणखी उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.
No comments:
Post a Comment