Friday 22 July 2016

क्रीडा लवादाकडूनही रशियन खेळाडू हद्दपार


उत्तेजकाचा विळखा रशियन खेळाडूंची पाठ सोडत नाही असेच दिसून येत आहे. क्रीडा लवाद न्यायालयानेही रशियाने ऑलिम्पिकमधील बंदीबाबत केलेला अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे रशियाच्या मैदानी स्पर्धेतील खेळाडूंचा ऑलिम्पिक प्रवेश अंधातरी झाला आहे. रशियातील अनेक खेळाडू उत्तेजक प्रकरणात सापडले होते. त्यांच्या अहवालात फेरफार करीत त्यांना पाठीशी घालण्यात आले होते. रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाने
मॉस्को येथील उत्तेजक प्रतिबंधक प्रयोगशाळेतील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने खेळाडूंना निदरेष सोडले होते. त्यांचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाची मान्यताच स्थगित केली व त्यांच्या धावपटूंना ऑलिम्पिक प्रवेश नाकारला.
येथील न्यायालयाने पत्रकात म्हटले आहे, आयएएएफने खेळाडूंवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यामुळे खेळाडूंना आगामी ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येणार नाही.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बंदीबाबतचा अंतिम निर्णय क्रीडा लवादाच्या निर्णयानंतर जाहीर करण्याचे ठरविले होते. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. बंदी घातली असली तरी रशियाने आगामी ऑलिम्पिकसाठी आपले पथक निश्चित केले आहे. त्यामध्ये पावणेचारशेहून अधिक जणांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment