Tuesday 19 July 2016

डोनाल्डचे वेगवान द्विशतक; शास्त्रीच्या विक्रमाशी बरोबरी


कॉलविन बे (लंडन) - ग्लॅमर्गनचा युवा क्रिकेटपटू ॲनेउरिन डोनाल्ड याने रविवारी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक झळकाविण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. डोनाल्डाने १२३ चेंडूंत २०० धावा करताना भारताच्या रवी शास्त्रीच्या १९८५ च्या  देशांतर्गत क्रिकेटमधील विक्रमाशी बरोबरी केली. डोनाल्डने १५ षटकार ठोकले. काउंटी सामन्यात १९ वर्षीय डोनाल्ड खेळपट्टीवर उतरला तेव्हा त्याच्या संघाची स्थिती ३ बाद ९६ अशी
होती. पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळणाऱ्या डोनाल्डने षटकारानेच आपले शतक साजरे केले. इंग्लंडचा १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार राहिलेल्या डोनाल्डला पहिल्या शतकानंतर दुसऱ्या शतकापर्यंत जाण्यासाठी केवळ ४३ चेंडू लागले. डोनाल्ड म्हणाला, ‘‘कठिण परिस्थितीतून संघाला भक्कम धावसंख्या उभारून देऊ शकलो याचे अधिक समाधान आहे. शास्त्री यांच्या विक्रमाशी बरोबरी केली हे समजल्यावर मला अधिक आनंद झाला. शास्त्रीदेखील ग्लॅमर्गनचे माजी खेळाडू होते.’’ डोनाल्डने १५० आणि २०० धावादेखील षटकारानेच पूर्ण केल्या. डोनाल्ड १३६ चेंडूंत २३४ धावा करून बाद झाला. ग्लॅमर्गनने दिवसअखेरीस ८ बाद ४९१ धावा केल्या होत्या.

No comments:

Post a Comment