Tuesday 19 July 2016

दलितमित्र भीमराव जाधव गुरूजींचे निधन

भटक्या विमुक्त जाती-जमाती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी महापौर, दलितमित्र भीमराव राजाराम जाधवगुरूजी (९६) यांचे रविवारी दुपारी एकच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन पुत्र, दोन कन्या, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँंग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी दुपारी मोरे हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
होणार आहेत. गांधीवादी विचारांचा पगडा असलेल्या भीमराव जाधव गुरूजी यांच्या निधनामुळे सोलापूरच्याच नव्हे, तर राज्यातील भटक्या विमुक्त चळवळीची हानी झाली आहे. ब्रिटिश राजवटीत भटक्या विमुक्त जाती-जमातींना गुन्हेगार घोषित करून तारेच्या कुंपणात ठेवले जात असे. त्यासाठी कठोर गुन्हेगारी कायदा अमलात आला होता. सोलापुरात रेल्वे स्थानकाच्या पलिकडे कैकाडी, पारधी, फासेपारधी, छप्परबंद व इतर तत्कालीन गुन्हेगार जमातींना तारेच्या कुंपणात ठेवले जात असे. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीत गांधीवादाचा प्रभाव सामान्यांवर वाढत असताना भटक्या विमुक्त जमातीही गांधीवादाकडे आकर्षित झाल्या. त्यातून गांधीवादाने भारावलेलय़ा भीमराव जाधव गुरूजींनी १९३९ साली सेटलमेंट सेवा संघाची स्थापना केली. नंतर १९४५ साली गुन्हेगारी जमातीचा कायदा रद्द होण्यासाठी चळवळ उभी केली. त्यासाठी प्रथमच गुन्हेगारी जमातीचे पहिले अधिवेशन आयोजित केले. या माध्यमातून जाधव गुरूजींनी भटक्या विमुक्त चळवळीला नवा आयाम दिला. दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे सोलापुरात आले असता त्यांच्या उपस्थितीत गु्न्हेगारी वसाहतीत असलेल्या तारांचे कुंपण तोडून तेथील भटक्या विमुक्त समाजाला मुक्त करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात या भटक्या विमुक्त समाजाच्या पुनर्वसनासाठी भीमराव जाधव गुरूजींनी शिक्षण व अन्य माध्यमातून भरीव  सेवाकार्य केले. त्यासाठी दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्यापासून अलीकडे शरद पवार यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी जाधव गुरूजींना मदत केली. हरिजन सेवक संघाच्या कार्याबरोबरच अक्कलकोट तालुक्यातील कल्याणनगरात शाहू फार्मिग सोसायटीसह महाराष्ट्र व कर्नाटकात अनेक गावांमध्ये भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळा सुरू केल्या. त्यांच्या या सेवाकार्याची दखल घेऊन १९७२ साली राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले होते. तसेच १९७३ साली सोलापूर महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने भीमराव जाधव गुरूजींना महापौरपदाचा मान मिळाला होता. 

No comments:

Post a Comment