Tuesday 19 July 2016

जुन्या पिढीतील तबलावादक तात्या देवळेकर यांचे निधन

जुन्या पिढीतील पट्टीचे तबलावादक पंडित रमाकांत शंकरराव तथा तात्या देवळेकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुधा, कमलेश व जगदीश ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जुन्या मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेल्या देवळेकर यांनी ‘तबला विशारद’ ही पदवी घेतली होती. त्यांना त्र्यंबकराव उमराणी, बसवण्णी मेंडिगिरी, लालजी गोखले, गणपतराव कवठेकर, भानुदासबुवा गुरव व
दत्तोपंत ऐतवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सन १९५१ पासून सलग ४० वष्रे ते आकाशवाणीवर तबलावादन करीत होते. पहिल्यांदा स्वतंत्रपणे व नंतर जुगलबंदीच्या कार्यक्रमात ते साथसंगत करत असत. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, गजानन जोशी, शांता आपटे, नूतन गंधर्व, विनायकराव पटवर्धन, के. जी. दिंडे, व्ही. जी. जोग, राम मराठे, प्रभाकर कारेकर,स्वरराज छोटा गंधर्व, काणेबुवा, पंडित सोलापूरकर अशा एक ना अनेक दिग्गज शास्त्रीय गायकांना तात्या देवळेकरांनी तबल्याची साथसंगत केली. बडोदा, अजमेर, बनारस, हैदराबाद, सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई अशा देशभरातील अनेक ठिकाणी तात्यांनी संगीत मैफिलीतून रसिकांची दाद घेतली. १९९१ मध्ये त्यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त कराडमधील त्यांच्या शिष्यगणांनी भीमसेन जोशी यांच्याहस्ते कराडमध्ये तात्यांचा सपत्नीक सत्कार केला होता. देवळेकरांच्या शिष्यगणांमध्ये प्रसाद पेंढारकर, विश्वनाथ पुरोहित, राजेंद्र आफळे,  पी. आर. जोशी, प्राची सावरकर आदींचा समावेश होतो. कराड गौरव, कलारत्न आदी पुरस्काराने ते सन्मानित झाले.

No comments:

Post a Comment