आघाडीचा वस्तू वायदा बाजार असलेल्या मल्टि कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया अर्थात एमसीएक्स कृषी क्षेत्रात नवीन चार-पाच सौद्यांच्या प्रस्ताव बाजार नियंत्रकाकडे सादर केला असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वत:चे क्लिअरिंग मंडळही कार्यान्वित करण्याची सर्व तयारीही पूर्ण झाली असल्याचे एमसीएक्सने स्पष्ट केले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी साधलेल्या आपल्या पहिल्या संवादात, एमसीएक्सचे
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांजपे यांनी नजीकच्या भविष्यात एमसीएक्ससाठी योजलेल्या प्राधान्यक्रमांची माहिती दिली. त्यांनी विविध विषयांसंदर्भात एक्स्चेंजच्या भूमिकेवर विस्ताराने भाष्य केले. नवीन उत्पादनांच्या प्रस्तुतीविषयी माहिती देताना ते म्हणाले, ऑप्शन्स आणि इंडायसेस यांसारख्या नवीन डेरिव्हेटिव्ह उत्पादनांबाबत एक्स्चेंजने तयारी पूर्ण केली आहे. शिवाय नवीन कृषी उत्पादनांमध्ये व्यवहारांसह, व्याज दराचे वायदा व्यवहार यांसारख्या उत्पादनांचा प्रस्ताव नियंत्रकाच्या विचारार्थ सादर करण्यात आला आहे. तसेच हेजर्सचे विशेषत: सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील मंडळींसाठी डिलिव्हरी करता येण्याजोग्या मूलभूत धातूचे सौदे सुरू करण्याची एमसीएक्सकडून व्यवहार्यता तपासली जात आहे. ऑप्शन्सचे व्यवहार सुरू झाल्यानंतर उलाढालीच्या मात्रेतील संभाव्य वाढीला पेलण्यासाठी एमसीएक्सचे तंत्रज्ञान पूर्णपणे समर्थ आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. एमसीएक्सवर सध्या कापूस, वेलची ही कृषी उत्पादने तसेच कच्चे पाम तेल, मेन्था तेलाचे वायदा सौदे सुरू आहेत. नव्याने दाखल होणारे सौदे कोणत्या जिन्नसांसाठी असेल हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. क्लिआरिंग कॉर्पोरेशनच्या स्थापनेबाबत परांजपे म्हणाले, जरी सेबीने यासाठी तीन वर्षांची मुभा दिली असली, तरी पुरेशी रोख हाती असल्याने आणि आवश्यक तंत्रज्ञानाचाही बंदोबस्त केला गेल्याने, विहित मुदतीच्या आधीच ते कार्यान्वित करण्याचा आपला प्रयत्न असेल. या आघाडीवर एमसीएक्सला प्रारंभिक ३०० कोटींची भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे. मधल्या काळात अनेक आव्हाने असतानाही सरासरी दैनंदिन उलाढालीचे प्रमाण नोव्हेंबर २०१३ मधील नीचांक स्तरापासून ते मे २०१६ मध्ये ६१ टक्कय़ांनी उंचावले आहे, अशी परांजपे यांनी माहिती दिली.
No comments:
Post a Comment