पुणे – येत्या २५ जून रोजी पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत तिच्या योजनांना सुरवात करण्याचा देशपातळीवरील कार्यक्रम होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या प्रसंगी उपस्थित राहणार असल्याची शक्यता उच्चस्तरीय प्रशासकीय सूत्रांनी वर्तविली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या शहरांची निवड झाली आहे. त्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना केंद्र सरकारच्या
नगरविकास विभागाने पत्र पाठविले असून, स्मार्ट सिटीची वर्षपूर्ती २५ जून रोजी होणार असल्याचे त्यात नमूद केले आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रीय कार्यक्रम पुण्यात करण्याचे ठरविले आहे. त्या वेळी स्मार्ट सिटीच्या योजनांबरोबरच स्मार्ट सिटीबाबत नागरिकांसाठी स्पर्धा, शहराची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन, स्मार्ट सिटीतील १५ योजनांची सुरवात आणि अमृत योजनेतील प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. तसेच स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेल्या सोलापूरातील काही प्रकल्पांचेही उद्घाटन या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. तसेच स्मार्ट सिटीतील अन्य ९८ शहरांशीही या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला जाणार आहे. स्मार्ट सिटीत निवड झालेल्या शहरांची केंद्र सरकारच्या एका पथकाने नुकतीच पाहणी केली होती. त्याचा आढावा घेऊन पुण्याची निवड करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment