Friday 22 July 2016

केप्लर मोहिमेत १०४ नवीन ग्रहांचा शोध लावण्यात यश

नासाच्या केप्लर या दुर्बिणीच्या रूपातील अवकाशयानाने आणखी १०४ ग्रह नवीन ग्रह शोधून काढले आहेत. त्यातील काहींवर सजीवसृष्टीस अनुकूलता असू शकते. एकूण १९४ खगोलीय घटक हे ग्रह असल्याची शक्यता आधी वर्तवण्यात आली होती. त्यातील १०४ हे आपल्या सौरमालेबाहेरील ग्रह असल्याची खातरजमा आता झाली आहे. या १०४ ग्रहांपैकी किमान चार ग्रह तर जीवसृष्टीस अनुकूल असण्याची शक्यता असून ते खडकाळ
असल्याचे मानले जाते. हे चारही ग्रह पृथ्वीपेक्षा व्यासाने २० ते ५० पट मोठे असून के २-७२ या बटू ग्रहाभोवती फिरत आहेत. अ‍ॅक्व्ॉरियस (कुंभ) या तारकासमूहाच्या दिशेने १८१ प्रकाशवर्षे दूर अंतरावर ते आहेत. मातृतारा सूर्यापेक्षा निम्म्या आकाराचा असून कमी प्रकाशमान आहे. या ग्रहांचा कक्षीय काळ साडेपाच ते २४ दिवस असून त्यांच्यापैकी दोन ग्रह ताऱ्याच्या प्रारणांना पृथ्वीपेक्षा जास्त प्रमाणात तोंड देत आहेत. बुधापेक्षाही जवळच्या कक्षेतून ते ताऱ्याभोवती फिरत असून या ग्रहांवर जीवसृष्टी वेगळ्या कुठल्या अवस्थेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अ‍ॅरिझोना विद्यापीठाचे आयन क्रॉसफील्ड यांनी सांगितले. संशोधकांनी या बाह्य़ग्रहांची निश्चिती नॉर्थ जेमिनी दुर्बीण व डब्ल्यू एम केक वेधशाळा (हवाई), स्वयंचलित ग्रहशोधक  (कॅलिफोर्निया विद्यापीठ), मोठी द्विनेत्री दुर्बीण (अ‍ॅरिझोना विद्यापीठ) यांच्या मदतीने केली आहे. केप्लर व के २ मोहिमात अनेक नवीन ग्रह शोधण्यात आले आहेत. ताऱ्यासमोरून ग्रह जातो तेव्हा अधिक्रमणाच्या वेळी प्रकाशात जो फरक पडतो त्या तंत्राने त्यांचा शोध घेतला आहे. केप्लरच्या सुरुवातीच्या मोहिमेत उत्तर अर्धगोलार्धात निरीक्षणे करण्यात आली होती व त्यात पृथ्वीप्रमाणे सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा शोध घेण्यात आला. त्यांचे आकार व तापमानही पृथ्वीसारखे आहे असे मानले जाते. २०१३ मध्ये केप्लर मोहीम पुन्हा सुरू झाली. त्याआधी या दुर्बिणीत बिघाड झाला होता पण तो दुरुस्त केल्याने तिला जीवदान मिळाले. के २ मोहिमेत पृथ्वीवरील उत्तर व दक्षिण अर्धगोलार्धातील वेधशाळांनी अंदाज केलेल्या प्रयोगशाळांच्या ग्रहांचे निरीक्षण केप्लरने केले. थंड, लहान, लाल बटू ताऱ्यांचे निरीक्षण यात शक्य असून असे तारे आकाशगंगेत आहेत. आपल्या सौरमालेबाहेरही असे लाल बटू तारे आहेत. केप्लर दोन मोहिमेत जवळच्या प्रखर ताऱ्यांवर भर देण्यात आला, असे क्रॉसफील्ड यांनी सांगितले. ‘अ‍ॅस्ट्रॉफिजिकल जर्नल’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

No comments:

Post a Comment