Wednesday 27 July 2016

पारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्रदक्षिणा पूर्ण


सोलर इम्पल्स २ या सौर विमानाने इंधनाचा थेंबही खर्च न करता जगप्रदक्षिणा पूर्ण केली असून त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सौर विमानाचा हा प्रवास ऐतिहासिक मानला जात आहे. सोलर इम्पल्स हे विमान गेल्या वर्षी नऊ मार्चला जगप्रवासासाठी निघाले होते ते शेवटच्या टप्प्यात कैरोहून ४८ तासात अबुधाबीला पोहोचले. हे विमान येथे पोहोचल्यानंतर अल बटीन एक्झिक्युटिव्ह
विमानतळावर उपस्थित लोकांनी टाळयांचा कडकडाट केला.
स्वित्र्झलडचे संशोधक व प्रकल्प संचालक बर्टाड पिकार्ड यांनी हे विमान चालवले. कैरो ते अबुधाबी अंतर २७६३ किलोमीटरचे आहे. तांबडा समुद्र व सौदी वाळवंट पार करून विमान येथे पोहोचले. या विमानाने जगप्रवासात ४२ हजार किलोमीटरचा प्रवास केला असून त्याने चार खंड, दोन महासागर व तीन सागर पार केले. सोलर इम्पल्स विमानाने कैरो येथून रविवारी अखेरच्या टप्प्यातील उड्डाण केले. विमानाने आधी आशिया, उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर आफ्रिका येथील प्रवास पूर्ण केला आहे.
पिकार्ड विमानातून बाहेर आले तेव्हा त्यांनी ऊर्जा भवितव्य स्वच्छ आहे व उद्याची वाट पाहण्याची गरज नाही; जे काही आहे ते आतापासूनच पुढे नेले पाहिजे. ऊर्जेच्या इतिहासात सोलर इम्पल्स या सौर विमानाने मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. इंधन समस्येवर उत्तरे आहेत, ती तंत्रज्ञानाच्या रूपात आहेत.
प्रदूषित जग आपण स्वीकारता कामा नये कारण लोक नेहमी वेगळा विचार करायला घाबरत असतात. सोलर इम्पल्स २ विमानाला पेपर प्लेन असेही म्हटले गेले होते. पिकार्ड व त्यांचे सहकारी आँद्रे बोर्शबर्ग यांनी या एक आसनी विमानाचा ताबा घेऊन आळीपाळीने ते चालवले. बोर्शबर्ग यांनी अखंडपणे ८९२४ किलोमीटर पर्यंत विमान चालवले. त्यात त्यांनी जपानमधील नागोया ते हवाई हे अंतर ११८ तासात पूर्ण केले होते. तेरा वर्षांपूर्वी हे साहस सुरू झाले होते असे त्यांनी सांगितले. हे विमान मोटारीपेक्षा जास्त जड नसून त्याचे पंख मात्र बोईंग ७४७ विमानाएवढे आहेत. त्याला चार इंजिने असून त्याच्या पंखात १७००० सौर घट बसवलेले आहेत.
ताशी ८० किलोमीटर वेगाने हे विमान जाते. त्यात वैमानिक श्वसनासाठी ऑक्सिजन टाकीचा वापर करतात. त्यांचा पोशाख हा वेगळा आहे. कॉकपिटमध्ये ते उणे २० अंश सेल्सियस ते अधिक ३५ अंश सेल्सियस तापमानाला बसू शकतात. पिकार्ड यांनी सांगितले की, २००३ मध्ये हा प्रकल्प आम्ही सुरू केला तेव्हा असाध्य ते साध्य करण्याचा ध्यास होता, तो आता पूर्ण झाला आहे.

No comments:

Post a Comment