Friday 22 July 2016

मुबारक बेगम


ऐन उमेदीच्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर स्वार होऊन रसिकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या अनेक कलावंतांवर त्यांच्या उत्तरायणात मात्र विस्मृतीच्या गर्तेत गटांगळ्या खात अखेरची घटका मोजण्याची वेळ येते. अशाच अवस्थेत जन्मलेल्या, ऐन उमेदीच्या काळात रसिकांच्या हृदयात स्थान मिळविलेल्या आणि विपन्नावस्थेतच अखेरच्या क्षणाला कवटाळलेल्या श्रेष्ठ गायिका, मुबारक बेगम! ..उण्यापुऱ्या ऐंशी वर्षांच्या
आयुष्यातील जेमतेम तीन-साडेतीन दशकांचा आपल्या स्मृतीच्या कप्प्यात जपलेला सुवर्णकाळ कुरवाळत या गायिकेने सोमवारी रात्री अखेरचा श्वास घेतला आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे एक वैभवशाली पर्वही संपुष्टात आले. १९५० ते १९७० या दोन दशकात दमदार आवाजाची मलिका म्हणून मुबारक बेगम यांचे नाव चित्रपटसृष्टीवर कोरले गेले. स्नेहल भाटकर यांच्या संगीताने सजलेल्या ‘हमारी याद आयेगी’ या मधाळ गीताचे मुबारक बेगम यांचे सूर आजही तितकेच जादूई वाटतात..
राजस्थानातील चुरू येथे १९४० मध्ये जन्मलेल्या या गायिकेचे बालपण फार ऐषारामात गेले नाही, जगण्याच्या संघर्षांत पाठीवर बिऱ्हाड घेऊन वणवण करणाऱ्या पित्याचे सुरांशी नाते असल्याने या मुलीचा स्वर ताजा राहिला. आकाशवाणीवरून गायकीची कारकीर्द सुरू करून शौकत दहेलवी यांच्या दिग्दर्शनाखाली पहिले गीत गायिले. कारकीर्दीच्या सुरुवातीसच यशाची चाहूल लागूनही, स्वभावत: बुजऱ्या असलेल्या या गायिकेला त्याचेच दडपण आले, आणि स्टुडिओत एका गाण्याच्या ध्वनिमुद्रणप्रसंगी जमलेली गर्दी पाहून बावरलेल्या या मुलीने अक्षरश: तेथून पळ काढला. पुढे हळूहळू सूर सापडू लागला. नर्गिसची आई जद्दनबाईंनी त्यांची काही संगीतकारांकडे शिफारस केली, आणि मुबारक बेगम संगीतसृष्टी गाजवू लागल्या. नौशाद, सचिनदा, शंकर जयकिशन, खय्याम, स्नेहल भाटकर अशा अनेक संगीतकारांच्या गीतांना त्यांनी आपला मधाळ स्वर बहाल केला आणि चित्रसृष्टीतील असंख्य गीते अजरामर झाली. पण या क्षेत्रातील गळेकापू स्पर्धेचा फटकाही त्यांना सोसावा लागला. ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटातील ‘परदेसियों से ना अखिया मिलाना’ या गीताचे ध्वनिमुद्रण त्यांच्या आवाजात झाले; पण ध्वनिमुद्रिका मात्र लता मंगेशकरांच्या आवाजात आली. या झटक्याने त्यांना कमालीची निराशा आली. १९८० मधील राम तो दीवाना है’मधील ‘सावरिया तेरी याद’ हे त्यांचे अखेरचे गाणे ठरले.. त्यांचे उत्तरायुष्य कमालीच्या हलाखीचे होते. पोषक आहाराच्या कमतरतेमुळे या गुणी गायिकेला आजारांचा विळखा पडला. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने त्यांच्या उपचारासाठी ८० हजारांची मदत देऊन पुढील उपचारांचा खर्च उचलण्याचेही जाहीर केले होते. पण त्या आजारातून त्या उठल्याच नाहीत. आता, ‘मुझको अपने गले लगा लो’, ‘मेरे आसुओं पे न मुस्कराना’, ‘जब इश्क कही हो जाता है’.. अशा सुरेल गीतांच्या लडींमधून या गायिकेच्या आठवणी जिवंत राहतील.

No comments:

Post a Comment