Tuesday 19 July 2016

विनय सहस्रबुद्धे, संभाजीराजे, डॉ. विकास महात्मे यांना खासदारपदाची शपथ -

राज्यसभेवर प्रथमच निवडून गेलेल्या महाराष्ट्रातील तीन खासदारांनी सोमवारी शपथ घेतली. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे आणि डॉ. विकास महात्मे यांचा समावेश होता. छत्रपती संभाजीराजेंचा शपथविधी पाहण्यासाठी  कोल्हापूरचा शाही परिवार लोटला होता. सोमवारी एकूण ४३ खासदारांनी शपथ घेतली. त्यामध्ये राज्यातील सहा जणांचाही समावेश होता. अर्थात
भाजपचे, मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रवादी काँग्रेसचे पफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत यांची फेरनिवड झाल्याने त्यांच्या शपथविधीबद्दल औत्सुक्य नव्हते. याउलट सहस्रबुद्धे, संभाजीराजे आणि डॉ. महात्मे हे प्रथमच राज्यसभेत आले आहेत. सहस्रबुद्धे आणि संभाजीराजे यांनी मराठीत, तर डॉ. महात्मे यांनी हिंदीतून शपथ घेतली. संभाजीराजेंचा शपथविधी पाहण्यासाठी शाही परिवारासह सुमारे पन्नास विशेष निमंत्रित राज्यसभेत आले होते. याशिवाय अन्य खासदारांच्या नातेवाईकांनी गर्दी केल्याने राज्यसभेच्या दर्शिकेमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. लोकसभा खासदार आणि पत्रकारांसाठी राखून ठेवलेल्या राखीव आसनांमध्ये अनेक निमंत्रित घुसले होते. त्यामुळे काही खासदारांना पत्रकारांच्या आसनांवर बसावे लागले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील विजयसिंह मोहिते-पाटील यांचा समावेश होता. ते संभाजीराजेंचा शपथविधीसाठी राज्यसभेत आले होते. शपथ घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी संसदेमधील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे वडील, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, बंधू मालोजीराजे आदी होते. ‘हमें तो आपने चमकाया है..’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्र्यांची ओळख लोकसभेत करून दिली. त्यात सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांचाही समावेश होता. आठवले यांनी निळ्या रंगाचा चमचमणारा कोट घातला होता. त्याचा उल्लेख करून मोदी त्यांना म्हणाले, तुम्ही आज चांगलेच चमकत आहात. त्यावर  हमें तो आपने चमकाया है, असे हजरजबाबी आठवले म्हणाले. 

No comments:

Post a Comment