Tuesday 19 July 2016

स्टेट बँक विलीनीकरणाला गती

सहयोगी बँकांच्या मूल्यनिश्चितीकरिता प्रस्ताव विचारणा सहयोगी पाच बँका व भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. विलिनीकरणासाठीचे मूल्य निश्चित करण्यासाठी एसबीआय कॅपिटलने प्रस्ताव मागविले आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला लेखा परिक्षकांची परवानगी घेण्यात आल्याची माहिती स्टेट बँक समूहातील एसबीआय कॅपिटलने बुधवारी दिली. याबाबतच्या
सध्याच्या नोटिशीत एसबीआय कॅपिटलने स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ मैसूर व स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर या तीन सहयोगी बँकांचा उल्लेख आहे. म्हणजेच या तीन सहयोगी बँकेचे मुख्य स्टेट बँकेत विलीनीकरणासाठी समभाग मूल्य, व्यवहार निश्चिती केली जाणार आहे. नंतरच्या टप्प्यात मुख्य बँकेच्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद व स्टेट बँक ऑफ पटियाळा यांचा क्रम लागण्याची शक्यता आहे. समभागांची रचना, त्यांचे मूल्य याबाबतचा प्रस्ताव मागविण्याकरिता ही नोटीस जारी करण्यात आली आहे. प्रत्येक बँकेकरिता स्वतंत्र किंमत सुचविण्यासह सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. विलिनीकरण प्रक्रियेसाठी स्टेट बँकेने १५ ते २० जणांचा गट केला असून सर व्यवस्थाकपदावरील व्यक्ती त्याचे नेतृत्व करत आहे. समूहातील पाच सहयोगी बँकांपैकी स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या तीन बँका भांडवली बाजारात सूचिबद्ध आहेत. स्टेट बँकेच्या संचालक मंडळाने मेमध्ये सुचविलेल्या सहयोगी व महिला बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. टप्प्या टप्प्याने मार्च २०१७ पर्यंत सर्व सहयोगी व महिला बँकेचे मुख्य बँकेत विलीनीकरण पूर्ण करण्याचे ध्येय स्टेट बँकेने राखले आहे. 

No comments:

Post a Comment